Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी! 17 किलो 994 ग्रॅम गांजासह तरुणाला अटक; 15 लाख 79 हजारांचा मुद्देमाल जप्त


इंचगाव टोलनाक्याजवळ पोलिसांची कारवाई; गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार आणि मोबाईलही जप्त

सोलापूर - प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. सोलापूर-मिरज महामार्गावरील इंचगाव टोलनाक्याजवळ स्विफ्ट कारमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 17 किलो 994 ग्रॅम गांजा, स्विफ्ट कार आणि मोबाईल असा एकूण 15 लाख 79 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मनोज राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर-मिरज महामार्गावरील इंचगाव टोलनाक्याजवळून एका स्विफ्ट कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 10 डीके 8897 या क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून येणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शुभम लालासाहेब काळे (वय 28) असे सांगितले. तो मूळचा लातूर येथील असून सध्या जत, जिल्हा सांगली येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

8 लाख 99 हजार 700 रुपयांचा गांजा जप्त

संशयिताच्या ताब्यातील कारमधील पोत्याची तपासणी केली असता, त्यामध्ये ओलसर हिरव्या रंगाचा, पाने, बिया आणि बोंडे असलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी 17 किलो 994 ग्रॅम वजनाचा, 8 लाख 99 हजार 700 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याशिवाय गांजाच्या वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार आणि मोबाईलही जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 15 लाख 79 हजार 700 रुपये आहे.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 302/2026 अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 च्या कलम 8(क) आणि 20(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभम काळे याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 16 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

आरोपीने गांजा कोठून आणला आणि तो कुठे नेणार होता, याचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस हवालदार दशरथ गोरे, अविनाश पाटील, रवी माने, अतुल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल अन्वर अत्तार, मनोज राठोड, प्रमोद गायकवाड, राहुल दोरकर तसेच कामती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अस्मान शेख आणि पोलीस हवालदार काळजे यांच्या पथकाने केली आहे..

Post a Comment

0 Comments