सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर शहरात रॅपिडो कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेली दुचाकीवरून प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह रिक्षाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
सोलापूर शहरात रॅपिडो कंपनीकडून दुचाकींच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू असून, ही वाहतूक बेकायदेशीर असल्याचा दावा ऑटोरिक्षा संघटनेने केला आहे. यापूर्वीही जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊन ही वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही ही वाहतूक सुरूच असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
नुकतेच पुणे शहरात दुचाकीवरून प्रवासी वाहतुकीवर बंदी घालण्याबाबत आदेश देण्यात आल्याचा उल्लेख करत, पुण्यात अशी कारवाई होऊ शकते, तर सोलापूरमध्ये का होऊ शकत नाही, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे तसेच आयटी पार्क नसल्यामुळे अनेक तरुण रोजगारासाठी ऑटोरिक्षा व्यवसायाकडे वळले आहेत. अशा परिस्थितीत रॅपिडोच्या दुचाकी प्रवासी वाहतुकीमुळे ऑटोरिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून रॅपिडो कंपनीच्या दुचाकी प्रवासी वाहतुकीची कायदेशीर तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास ही वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर सोलापूर जिल्हा ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे, सचिव सुनील माने, जिल्हा सचिव गजानंद लोणार, तानाजी मसलकर, विशाल लोंढे, दादाराव डुरके, महीपती पवार यांच्यासह अन्य रिक्षाचालकांचा सहभाग होता.
0 Comments