सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्चिड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. उत्कृष्ट तांत्रिक खेळ, अष्टपैलू कामगिरी आणि जिद्दीच्या जोरावर रिषभ गोचडे आणि मृण्मयी गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे दोघांची आगामी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत तसेच सो.म.पा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या आयोजनातून झालेल्या शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळातील कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार (दादा) करजगी, संस्थेच्या सचिव सौ. वर्षाताई विभुते, स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, स्कूलच्या मार्गदर्शिका मीना पारखे आणि प्राचार्या रश्मी कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा विभागप्रमुख आनंद लिगाडे आणि ज्ञानदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
0 Comments