दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सक्तीची कर्जवसुली थांबवा, कर्जांचे पुनर्गठन करण्याचे निर्देश
सोलापूर | प्रतिनिधी: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी आणि पात्र कर्जदारांच्या कर्जांचे पुनर्गठन करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सक्तीची वसुली किंवा जप्तीची कारवाई केल्याचे आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्ह्यात कार्यरत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, मायक्रो फायनान्स कंपनी नेटवर्कचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष देवेंद्र शहापूरकर तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, दुष्काळामुळे अनेक नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे कंपन्यांनी संवेदनशीलता दाखवत शासनाच्या निर्देशानुसार सक्तीची वसुली थांबवावी. कर्जफेड करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना आर्थिक शिस्तीचे महत्त्व समजावून सांगावे, तसेच गरजू आणि पात्र ग्राहकांना कर्जवाटप सुरू ठेवून त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यास मदत करावी.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments