Advertisement

Responsive Advertisement

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी घेतला आढावानिवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा; हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही


सोलापूर, प्रतिनिधी : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. निवडणुकीच्या कामात कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षप्रमुख अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कासेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्यासह विविध विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात १९३ मतदान केंद्रांचे नियोजन

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांत एकूण १९३ मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ११७, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७६ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, मतदान साहित्य, स्ट्राँग रूम व्यवस्थापन आणि इतर निवडणूकविषयक कामांच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कासेकर यांनी जिल्ह्यातील निवडणूक व्यवस्थापनाची माहिती सादर केली.

मतदान साहित्य वितरणाचे नियोजन

मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वितरण २१ ऑक्टोबर रोजी रामवाडी गोडाऊन येथून तालुकास्तरीय यंत्रणांना करण्यात येणार आहे. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी सकाळी तालुकास्तरावरून मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे साहित्य सुपूर्द करण्यात येईल. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व साहित्य रामवाडी गोडाऊन येथे जमा करण्यात येणार असून, त्यानंतर सर्व मतपेट्या पुण्यातील बालेवाडी येथे नेण्यात येतील.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी आणि पोलीस यंत्रणेने योग्य समन्वय राखून चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. तसेच सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूकविषयक प्रशिक्षण गांभीर्याने घेऊन मतदान व मतमोजणीच्या दिवशी त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल

आदर्श आचारसंहिता कक्षप्रमुख अभिजित पाटील यांनी आचारसंहिता अंमलबजावणीचा आढावा सादर केला. आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल झाले असून, आतापर्यंत १७९ शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी खासगी आस्थापनांतील कामगारांना मतदानासाठी चार तासांची विशेष सवलत देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी तथा साहित्य व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी ओंकार पडोळे यांनी निवडणूक आयोगाकडून आवश्यक साहित्य उपलब्ध झाले असून, त्याचे २१ ऑक्टोबर रोजी तालुकानिहाय वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

२२ प्रकारच्या नोडल अधिकाऱ्यांनी सादर केले अहवाल

बैठकीत आदर्श आचारसंहिता व कायदा-सुव्यवस्था, मनुष्यबळ, वेबकास्टिंग, प्रशिक्षण, साहित्य व्यवस्थापन, मतदार जनजागृती कार्यक्रम (SVEEP), मतपत्रिका, पोस्टल बॅलेट, माध्यमे, दळणवळण, वैद्यकीय सुविधा आणि जम्बो बॅलेट बॉक्स यांसह विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

मनुष्यबळ व वेबकास्टिंगचे नोडल अधिकारी आशिष लोकरे, प्रशिक्षण व्यवस्थापनाचे संतोषकुमार देशमुख व सुशांत बानसोडे, साहित्य व्यवस्थापनाचे ओंकार पडोळे आणि मतदार जनजागृती कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित कामकाजाची माहिती दिली.

निवडणुकीशी संबंधित सर्व २२ प्रकारच्या नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांच्या तयारीचा अहवाल सादर केला. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून, निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments