सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन देशी बनावटीची गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण
१ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १९ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि पोलीस अंमलदार सचिन महादेव भांगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, विमानतळाच्या मागील रस्त्याने सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ८० फूट रस्त्यावरील नागनाथ नगर परिसरात, सनराईज शाळेसमोरील मोकळ्या मैदानात एक इसम गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार आहे.
या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वाखाली DB पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई केली.
झडतीत दोन गावठी पिस्तूल आढळली
पोलिसांनी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास
हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी (वय ४१, रा. शिवगंगा
नगर भाग-१, लीडर हॉटेलजवळ, नई जिंदगी, सोलापूर)
याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडील पांढऱ्या-निळ्या रंगाच्या मोटारसायकलची आणि त्याची झडती घेतली असता, कमरेला एक गावठी पिस्तूल, पॅन्टच्या खिशात चार जिवंत काडतुसे, तर मोटारसायकलच्या डिक्कीत आणखी एक गावठी पिस्तूल आढळून आले.सदर शस्त्रे बाळगण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन भांगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०३/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
शस्त्रे पुण्यातून विकत घेतल्याची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपीने त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली दोन्ही गावठी पिस्तूल आणि चार काडतुसे पुणे येथील ओळखीच्या एका व्यक्तीकडून विकत घेतल्याचे सांगितले आहे. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध एक आणि महिलांविषयक एक, तसेच जेलरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक, असे एकूण तीन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण देवकर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार आणि गुन्हे विभागाच्या पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्यासह पोलीस अंमलदार राकेश पाटील, संदीप जावळे, सचिन भांगे, आमसिद्ध निंबाळ, एकनाथ उबाळे, सचिनकुमार लवटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्हाण, अजित माने, अविनाश दिघोळे, अमोल खरटमल, सकलेन मुकादम, अय्याज बागलकोटे, कुमार बोल्ली आणि महिला पोलीस अंमलदार दीपाली राठोड यांनी सहभाग घेतला.
0 Comments