बेंगळुरूपर्यंत तपासाची धडक; तक्रारदारांना चोरीच्या मोटारसायकली परत
वळसंग - प्रतिनिधी : वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या ४ मोटारसायकलींचा शोध घेऊन त्या हस्तगत करण्यात वळसंग पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी करमाळा, पुणे जिल्हा तसेच कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे तपास करून ४ आरोपींना अटक केली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोटारसायकली संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आल्या आहेत.
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगडगाव, शिरवळ (जै.) आणि होटगी या गावांमधून मागील ४ महिन्यांत मोटारसायकली चोरीस गेल्या होत्या. या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना तपास अधिकारी पोलीस हवालदार श्रीशैल माळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर पोलिसांनी कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे जाऊन तपास केला आणि ४ आरोपींना अटक करून विविध गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या ४ मोटारसायकली हस्तगत केल्या.
या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, वाहनमालकांना त्यांच्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली पुन्हा मिळाल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या मोहिमेत तपास अधिकारी पोलीस हवालदार श्रीशैल माळी, पोलीस हवालदार विकास क्षिरसागर, पोलीस नाईक संतोष चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल महेश कुंभार आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद मांढरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
0 Comments