Advertisement

Responsive Advertisement

संवादातून डिजिटल भविष्याकडे! रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो व भावसार व्हिजनचा स्तुत्य उपक्रम

‘जेन-झी ई-पोस्ट ऑफिस’ संवाद-भेट उत्साहात; २० गरजू मुला-मुलींसाठी सुकन्या समृद्धी व पीपीएफ खाती मोफत उघडून देणार

सोलापूर - प्रतिनिधी : डिजिटल युगात टपाल विभागाच्या आधुनिक सेवांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासोबतच गरजू मुला-मुलींच्या आर्थिक भविष्याला सुरक्षिततेची जोड देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो आणि भावसार व्हिजन – सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जेन-झी ई-पोस्ट ऑफिस’ संवाद-भेटीचे आयोजन गुरुनानक नगर येथील न्यू ई-पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आले. ‘संवाद जोडतो... पिढ्यांना भविष्याशी...’ आणि ‘Digital Connect Brighter Future’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे. श्रीकांत अंजुटगी यांनी केले. डिजिटल युगात टपाल विभागाच्या बदलत्या स्वरूपाची आणि आधुनिक ई-सेवांची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. सौ. भाग्यश्री सोमवंशी यांनी ऑनलाइन टपाल सेवा, डिजिटल सुविधा आणि विभागातील तांत्रिक बदलांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

काही तासांत टपाल घरपोच देण्याची योजना

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सोलापूर विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर श्री. हेमंत खडकेकर यांचे मार्गदर्शन. टपाल विभागाच्या आधुनिक सेवा आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना त्यांनी नागरिकांना अधिक जलद व दर्जेदार सेवा देण्यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

येत्या काळात ‘ब्लिंकइट’च्या धर्तीवर बुक केलेले टपाल अवघ्या काही तासांत घरपोच पोहोचविणारी अतिजलद सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रस्तावित सेवेमुळे टपाल वितरण अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार

कार्यक्रमात बचतीचे महत्त्व अधोरेखित करत मुला-मुलींच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टीने विशेष बचत खाती उघडण्यात आली. श्री. प्रवीण पतंगे आणि श्री. नितीन माळवदकर यांच्या मुलींसाठी तसेच श्री. मनोज क्षीरसागर यांच्या नातीसाठी सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यात आली. याशिवाय त्यांच्या नातवासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ खाते सुरू करण्यात आले.

या उपक्रमातून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी बचतीची सवय रुजविण्यासोबतच कुटुंबांना दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२० गरजू मुला-मुलींची खाती मोफत उघडणार

सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो आणि भावसार व्हिजन – सोलापूर यांनी समाजातील गरजू कुटुंबांतील २० मुला-मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफ खाती मोफत उघडून देण्याचा संकल्प जाहीर केला. दोन्ही संस्थांच्या प्रायोजकत्वातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

डिजिटल साक्षरता, आर्थिक बचत आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम घडविणारा हा उपक्रम गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमात रोटे. महेश नक्का, श्री. योगीन गुर्जर आणि श्री. मनोज क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष रोटे. दिनेश काटकर, सचिव रोटे. कल्लाप्पा गुरव, भावसार व्हिजन सोलापूरचे अध्यक्ष श्री. आशिष जवळकर, सचिव श्री. हर्षल माळवदकर, खजिनदार श्री. निशिकांत पुकाळे, माजी अध्यक्ष श्री. विशाल खमीतकर, संचालक श्री. मनोज क्षीरसागर, श्री. रमेश माळवे आणि श्री. सुहास राशीनकर उपस्थित होते.

तसेच सहाय्यक अधीक्षक श्री. संदीप घोडके, पोस्टमास्तर श्री. विलास मस्तूद आणि टपाल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जनसंपर्क निरीक्षक श्री. श्रीरंग रेगोटी यांनी आभार मानले.

डिजिटल परिवर्तनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम तरुण पिढीला आधुनिक टपाल सेवांशी जोडणारा आणि गरजू मुला-मुलींच्या आर्थिक भविष्याचा विचार करणारा दिशादर्शक प्रयत्न ठरला आहे.

Post a Comment

0 Comments