पंढरपूर प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, तसेच ग्रामस्थांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने ‘आपलं वाचनालय’ सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन यशदा, पुणे येथील उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यशदा, पुणे येथील नवनियुक्त अधिकारी (CPTP-12) आणि ग्रामपंचायत गोपाळपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वाचनालयासाठी यशदा, पुणे तसेच विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुस्तकांची भेट देऊन उपक्रमाला हातभार लावला.
वाचनालयासाठी पुस्तकांची भरघोस भेट
यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्याकडून ५० पुस्तके, पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याकडून ५० पुस्तके, तर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांकडूनही ५० पुस्तकांचा संच ग्रामपंचायतीला भेट देण्यात आला. ग्रामविकास पंचायत अधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे हा पुस्तकसंच सुपूर्द करण्यात आला. गावातील अंगणवाडी सेविकांनीही पुस्तकांची भेट देत या उपक्रमात सहभाग नोंदविला.
या वाचनालयामुळे गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध होतील. त्याचबरोबर युवक, महिला आणि इतर ग्रामस्थांनाही वाचनाची गोडी लागण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागात ज्ञानाची देवाणघेवाण वाढविण्यासाठी आणि अभ्यासपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, यशदाचे विषयतज्ज्ञ कुलकर्णी, समन्वयक श्री. कचरे, एस. आर. प्रशासक सचिन जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी क्षितिज पाटील (डीवायएसपी), नितीन आसबे (गटविकास अधिकारी), अमित नंदेश्वर (गटविकास अधिकारी), आशिष गायकवाड व सुमित कानडे (वित्त व लेखाधिकारी), शक्तिसिंह कार्वेकर आणि अनिरुद्ध चव्हाण (सहाय्यक राज्यकर आयुक्त) उपस्थित होते.
याशिवाय शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गोपाळपूर गावात वाचनसंस्कृतीला चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांसह सर्व ग्रामस्थांसाठी हे वाचनालय ज्ञानाचे नवे दालन ठरणार आहे.
0 Comments