सोलापूर (प्रतिनिधी) : रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूरच्या वतीने विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १९३ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ वाहनांना चलन (मेमो) बजावण्यात आले. या कारवाईतून एकूण २४ लाख ६० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई
या तपासणी मोहिमेदरम्यान भंगार रिक्षा, अल्पवयीन चालकांकडून चालविली जाणारी वाहने, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (एचएसआरपी) नसलेली वाहने, वैध वाहनचालक परवाना नसलेले चालक, वैध योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नसलेल्या रिक्षा, विमा नसलेली वाहने तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आरटीओच्या पथकाचा मोहिमेत सहभाग
ही मोहीम प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या निर्देशानुसार आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे, दिनेश ढोकणे, गणेश तपकिरे, प्रणव चव्हाण, श्रेयस सरागे आणि धनंजय थोरे यांनी आपल्या पथकातील सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह सहभाग घेतला.
वाहनधारकांना कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे आवाहन
वाहनधारकांनी आपल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे वैध व अद्ययावत ठेवावीत. वाहन चालविताना मोटार वाहन कायद्यातील सर्व लागू तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments