सोलापूर - प्रतिनिधी : जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका सराईत चोरट्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे सात मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जेलरोड पोलिस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
प्रवीण मोहन कंदीकटला (वय ३५, रा. जुने विडी घरकुल, सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. जेलरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत संबंधित व्यक्तीबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वल्याळ क्रीडांगण परिसरातील सार्वजनिक रस्त्यावरून त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडील पिशवीमध्ये विविध कंपन्यांचे सात मोबाईल आढळून आले. पोलिसांनी दुचाकी आणि मोबाईलच्या कागदपत्रांची तसेच अभिलेखांची पडताळणी केली असता, जेलरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील आणि पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, शरीफ शेख, पोलिस हवालदार वहाब शेख, धनाजी बाबर, स्वप्निल इंगळे, पोलिस नाईक उमेश सावंत, इकरार जमादार, किशोर व्हाणगुंटी, संतोष वायदंडे आणि विठ्ठल जाधव यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल धनाजी बाबर करीत आहेत.
0 Comments