मोहोळ (विशेष प्रतिनिधी) : योग्य मार्गदर्शन, कठोर मेहनत आणि जिंकण्याची जिद्द यांच्या जोरावर मोहोळच्या कराटेपटूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. सातारा येथील स्वराज्य सांस्कृतिक भवन येथे ओकीनावा मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण २७ पदकांची कमाई केली. यामध्ये ११ सुवर्ण, ७ रौप्य आणि ९ कांस्यपदकांचा समावेश असून, या यशामुळे मोहोळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी कुमिते (फाईट) आणि काता या दोन्ही प्रकारांत आपले कौशल्य सिद्ध केले. प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
कुमिते प्रकारात खेळाडूंची चमकदार कामगिरी
कुमिते प्रकारात दुर्गेश पाटील, अली शेख, आदर्श सुळे, स्नेहल ठोंबरे, स्वराली सगरे, रुचिरा मंगरुळे, अनन्या देशमुख, प्रतीक्षा सैनी, संस्कृती गायकवाड आणि हर्षदा वाघमोडे यांनी सुवर्णपदक पटकावले.
समर्थ कोकणे, संस्कार गायकवाड, विराट वाघमोडे, स्नेहल कोकणे आणि मानसी कोकणे यांनी रौप्यपदकाची कमाई केली. तर ऋषिकेश शेडजाळे, शिवराज सुरवसे, आर्या ठोंबरे, स्वामिनी कांबळे, आर्या शिंदे, कृष्णाली नरुटे, सिद्धी पांढरे आणि तनुजा बारसकर यांनी कांस्यपदक मिळवून अकॅडमीच्या यशात मोलाची भर घातली.
काता प्रकारातही पदकांची लयलूट
काता प्रकारात आदर्श सुळे याने सुवर्णपदक पटकावले. संस्कार गायकवाड आणि विराट वाघमोडे यांनी रौप्यपदक, तर ऋषिकेश शेडजाळे याने कांस्यपदक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले.
मुख्य प्रशिक्षक दशरथ काळे सरांच्या मार्गदर्शनाला यश
या यशामागे क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक दशरथ काळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे मानले जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि जिद्द निर्माण करण्याचे काम काळे सर सातत्याने करत आहेत.
नियमित सराव, तंत्रशुद्ध प्रशिक्षण, काटेकोर नियोजन आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवण्यासाठी तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी मिळवलेले हे यश मोहोळच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
या दैदीप्यमान कामगिरीबद्दल सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे, मुख्य प्रशिक्षक दशरथ काळे सरांचे आणि क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे सोलापूर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
0 Comments