सोलापूर - प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल मोटिव्हेशनल राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. येत्या २८ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे आयोजित सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
एबीएम (अमोल भगत मीडिया) आणि संस्कृती पब्लिकेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ‘सेकंड एडिशन सरदार वल्लभभाई पटेल मोटिव्हेशनल अवॉर्ड २०२६ – बेस्ट कॉन्ट्रिब्युशन इन सोशल ॲक्टिव्हिटीज’ या पुरस्कारासाठी भतगुणकी यांची निवड करण्यात आली आहे. हैदराबाद येथील गाचीबावली परिसरातील लेमन ट्री हॉटेलमध्ये सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
काशिनाथ भतगुणकी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा ठसा उमटविला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, कृषी पर्यटनाला प्रोत्साहन, राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र, हुरडा पार्टीचे आयोजन, ड्रीम फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांसाठी राबविण्यात येणारे कौशल्य विकास उपक्रम तसेच साहित्य संमेलनांच्या आयोजनातून त्यांनी सामाजिक, कृषी आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
भतगुणकी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सोलापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे ड्रीम फाऊंडेशनच्या कार्यालाही राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे.
0 Comments