Advertisement

Responsive Advertisement

विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी शिक्षकांना विशेष नैमित्तिक रजा ! शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची माहिती; पात्र शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सवलत

सोलापूर - प्रतिनिधी : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येणार आहे. याबाबत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी माहिती दिली.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या १ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्यातील शाळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या आणि संबंधित मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेल्या पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी नियमानुसार विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे सूचित करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता यावे, याची दक्षता घेण्याबरोबरच मंजूर रजेची नोंद शाळेच्या अभिलेखात नियमानुसार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

निवडणुकीसंदर्भातील या सूचनांची सर्व संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. मतदानाचा हक्क बजावण्यापासून कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments