Advertisement

Responsive Advertisement

सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणात १५ आरोपींना अटक; गुन्ह्यातील वाहने व लोखंडी हत्यारे जप्त


वळसंग पोलिसांची कारवाई; उर्वरित आरोपींच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके रवाना

वळसंग - प्रतिनिधी : वळसंग गावात दोन गटांत झालेल्या वादातून सद्दाम आमलीचुंगे यांना बेदम मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणात वळसंग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी यासीन अब्बास कटरे, मोहसीन वजीर तांबोळी आणि बुडन कटरे यांच्यासह एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि लोखंडी हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी वळसंग गावात दोन गटांत वाद झाला होता. या वादादरम्यान सद्दाम आमलीचुंगे यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना ११ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आतापर्यंत १५ आरोपींना अटक केली आहे.

तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक इनोव्हा कार, एक महिंद्रा स्कॉर्पिओ, एक रिक्षा, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप आणि इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी वळसंग पोलीस ठाण्याची तीन (३) स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट राजेंद्र टाकणे आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे करीत आहेत.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कोळी, पोलीस हवालदार देवकर, मालचे, मियाँवाले तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद मांढरे आणि गजानन गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Post a Comment

0 Comments