भगवे फेटे, मानाचा भगवा ध्वज आणि जयघोषाने शहरात भक्तिमय वातावरण
सोलापूर - प्रतिनिधी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री दुर्गामाता दौडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. भगवे फेटे परिधान केलेले शेकडो धारकरी, अग्रभागी मानाचा भगवा ध्वज आणि त्यामागे मानाचे शस्त्र पथक अशा शिस्तबद्ध वातावरणात ही दौड पार पडली. नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेपासून शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीचा विजयादशमीला समारोप झाला.
दौडीच्या प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते आणि भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक महेश करकंटी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दौडीला सुरुवात झाली. आमदार देवेंद्र कोठे यांनी मानाचा भगवा ध्वज हाती घेऊन दौडीत सहभाग नोंदविला.
‘देशासाठी जगायचं रं, शिवबानं सांगावा धाडलाय रं’, ‘भारत हिंदुस्थान है, हिंदूओंकी शान है’, ‘जय भवानी, जय शिवराय’ अशा गीतांचा आणि घोषणांचा जयघोष करत धारकरी मार्गक्रमण करत होते. शहरातील विविध ठिकाणी हिंदू बांधवांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घालून आणि पुष्पवृष्टी करून दौडीचे स्वागत केले. शेकडो युवक एकाच वेळी सहभागी झाले असतानाही दिसून आलेल्या शिस्तीचे नागरिकांनी कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली दौड बाळीवेस, कसबा गणपती, मसरे गल्ली, चौपाड श्री बालाजी मंदिर, चौपाड श्री विठ्ठल मंदिर, राजवाडे चौक, दत्त चौक, पाणीवेस, झुंजे बोळ, अनंत दूध डेअरी, माणिक चौक आणि श्री आजोबा गणपती मंदिरमार्गे श्री चौडेश्वरी मंदिर येथे पोहोचली. मंदिरात आरती आणि ध्येयमंत्राने दौडीची सांगता झाली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.
0 Comments