Advertisement

Responsive Advertisement

अंध व दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करा ! मदतनीस सुविधेसाठी तीन दिवस आधी लेखी सूचना आवश्यक; नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित होणार

सोलापूर - प्रतिनिधी : अंध अथवा दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक सहकार्य व सुविधा उपलब्ध करून देताना निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश निवडणूक यंत्रणेला देण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुलभ करताना मतदारांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मदतनीसाला मतदान कक्षात प्रवेश देण्याबाबत नियम

मतदारांना मदत करण्यासाठी आलेल्या मदतनीसाला किंवा सोबत्याला सरसकट मतदान कक्षात प्रवेश देता येणार नाही. मात्र, अंध अथवा दिव्यांग मतदारांच्या बाबतीत निवडणूक संचालन नियम, १९६१ मधील नियम ४०-अ अंतर्गत निर्धारित तरतुदींनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मदतनीस सुविधेसाठी तीन दिवस आधी अर्ज आवश्यक

अंधत्व अथवा दिव्यांगत्वामुळे मदतनीसाची सुविधा आवश्यक असलेल्या मतदाराने मतदानाच्या दिवसाच्या किमान तीन दिवस आधी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी सूचना देणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती संबंधित स्तरावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पात्रता तपासून मतदार यादीत नोंद

मदतनीस सुविधेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून संबंधित मतदाराची पात्रता तपासण्यात येईल. मतदार पात्र आढळल्यास मतदार यादीत त्याच्या नावासमोर नियमानुसार खूण करून नोंद घेण्यात येणार आहे. तसेच, पात्र मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येईल.

घोषणापत्र आणि नोंदवही अनिवार्य

मतदानाच्या दिवशी मतदान करण्यापूर्वी संबंधित मतदाराने अंध किंवा दिव्यांग असल्याबाबतचे घोषणापत्र परिशिष्ट XI(ii)-C मधील विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर केंद्राध्यक्षांनी निवडणूक संचालन नियम, १९६१ मधील संबंधित तरतुदींनुसार पुढील कार्यवाही करावी.

या प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्षांनी नमुना १४-अ मध्ये आवश्यक नोंदी ठेवाव्यात. नियम ४०-अ मधील सर्व तरतुदींचे पालन करून कोणतीही अनियमितता होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अभिलेखांची होणार छाननी

नमुना १४-अ मधील नोंदींसह संबंधित कागदपत्रे, व्हिडिओ चित्रीकरणाची सीडी, सूक्ष्म निरीक्षकांचा अहवाल आणि केंद्राध्यक्षांचा अहवाल यांची निवडणूक निरीक्षकांमार्फत छाननी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावरील नोंदवही पूर्ण भरलेली आणि स्वाक्षरीसह असल्याची खात्री करून ती विहित वेळेत निवडणूक साहित्याबरोबर जमा करावी.

प्रशिक्षणात स्पष्ट सूचना देण्याचे निर्देश

केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणादरम्यान या सर्व सूचनांची स्पष्ट माहिती द्यावी. प्रत्येक मतदान केंद्राला घोषणापत्राचे नमुने आणि नमुना १४-अ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. मदतनीस सुविधेसाठी आगाऊ प्राप्त झालेले अर्ज आणि पात्र मतदारांची यादी संबंधित केंद्राध्यक्षांना देण्याचेही निर्देश आहेत.

मतदानानंतर नमुना १४-अ संकलित करून निवडणूक निरीक्षकांच्या छाननीसाठी उपलब्ध करून द्यावा. या सूचनांचे पालन करण्यात कोणत्याही स्तरावर कसूर झाल्यास संबंधितांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तुषार ठोंबरे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments