Advertisement

Responsive Advertisement

मंद्रूपमध्ये गुटखा कारखान्यावर छापा ! १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

दक्षिण - सोलापूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात मंद्रूप पोलिसांनी कारवाई केली. मंद्रूप पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, १ लाख ८० हजार ९५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वीही मंद्रूप पोलिसांनी अवैध गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा दबाव वाढला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अशोक यमनप्पा इलागेर (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संयुक्त पथकाची कारवाई

१२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मंद्रूप पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला. या कारवाईत महिबूब महंमद हनीफ शेख (वय ४०, रा. मंद्रूप) आणि सद्दाम मकतुम मुल्ला (वय ३५, रा. बंदलगी बंधारा) यांच्या ताब्यातून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

गुटखा तयार करण्याचे साहित्यही जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईत विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, शॉट लक्झरी च्युइंग टोबॅकोची शेकडो पाकिटे, १४ किलो बारीक सुपारी, ५६ किलो चुना, १२२ किलो मोकळे पाऊच आणि ३८ रबर पाकिटे जप्त करण्यात आली.

याशिवाय गुटखा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन बँड सीलर मशीन, चार वजनकाटे, एक सुपारी कटिंग मशीन आणि एमएच १३ डीएल ८७६६ क्रमांकाचे चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८० हजार ९५८ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे करीत आहेत. या कारवाईमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अवैध गुटखा निर्मिती व विक्रीच्या प्रकारावर प्रकाश पडला आहे.

Post a Comment

0 Comments