जत (प्रतिनिधी) :- विठ्ठल नगर प्रभाग क्रमांक १ मधील जिल्हा परिषद शाळेत काही अज्ञात दारुडे आणि टवाळखोरांनी धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेची सुरक्षा भिंत पाडणे, झाडांची तोडफोड करणे, सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे आणि थेट वर्गखोल्यांमध्ये दारूच्या बाटल्या फोडण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत.
आज तर हद्दच झाली. वर्गखोल्यांमध्ये सर्वत्र काचांचा खच पडल्याने लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत आज शाळा व्यवस्थापन समिती आणि स्थानिक रहिवाशांनी थेट ११२ या आपत्कालीन पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. पोलीस पथकाने प्रत्यक्ष शाळेत येऊन पाहणी केली असून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी केली आहे. पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधील सर्व पालक आणि नागरिकांना शाळा व्यवस्थापन समिती व समाजसेवक सिद्धू जाधव यांनी कडक इशारा दिला आहे.
रोज संध्याकाळी, शनिवार-रविवारच्या सुट्टीत किंवा इतर कोणत्याही वेळी शाळेच्या आवारात हुल्लडबाजी, दारू पिणे किंवा तोडफोड करताना कोणी आढळल्यास त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट पोलिसांच्या हवाली केले जाईल. शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि शैक्षणिक संस्थेचे वातावरण खराब केल्याप्रकरणी संबंधितांवर अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
पालकांनी आपल्या घरातील तरुण मुलांवर लक्ष ठेवावे. पोलीस कारवाईत कोणाचे करिअर किंवा भविष्य उद्ध्वस्त झाल्यास त्याला स्वतः संबंधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब जबाबदार राहील, असेही आवाहन करण्यात आले आहे. हा आपल्या विठ्ठल नगरच्या अब्रूचा आणि लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न असून सर्वांनी वेळीच सुधारावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments