सोलापूर - प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यात यंदा भीषण दुष्काळ पडला असून, पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत, तर पिके डोळ्यांदेखत करपून जात आहेत.
या पार्श्वभूमीवर, मंद्रूप येथील ऐतिहासिक सीतामाई तलावात उजनी कालव्यातून तात्काळ पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आज रविवारी संतप्त शेतकऱ्यांनी येळेगाव येथे थेट कालव्यात उतरून तीव्र 'जलआंदोलन' केले.
जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आप्पाराव कोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. सीतामाई तलावातील पाणीपातळी झपाट्याने खाली जात असल्याने शेतकरी सातत्याने प्रशासनाकडे उजनीचे पाणी सोडण्याची मागणी करत होते. मात्र, प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या टाळाटाळीमुळे अखेर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला.
"तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. जर प्रशासनाने सीतामाई तलावात पाणी सोडण्याचा निर्णय तातडीने घेतला नाही, तर आगामी काळात यापेक्षाही अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
या आंदोलनात माजी उपसरपंच रमेश नवले, शेतकरी शिलू बोराळे, अप्पाशा नडविनंगळ, अमोगसिद्ध बोराळे, विलास नवले, सुंदरकांत बोराळे, उत्तम वाघमोडे, शिवानंद जोडमोटे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
0 Comments