सोलापूर (प्रतिनिधी) — पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला निर्जनस्थळी बोलावून घेतल्यानंतर पोलीस असल्याची बतावणी करत मारहाण करून त्याच्याकडील ६ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीतील चार आरोपींना सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. आरोपींकडून कार, दुचाकी, पाच मोबाईल फोन आणि ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२), २०४, २०५, ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गोदी बोगदा, स्मशानभूमीजवळील सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादीस पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेण्यात आले. फिर्यादी घटनास्थळी आल्यानंतर तेथे आणखी तीन साथीदार आले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे भासवून फिर्यादीस मारहाण केली आणि त्याच्याकडील ६ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.
घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना शहर गुन्हे शाखेच्या पथकांना दिल्या. त्यानुसार तपास सुरू असताना दि. २८ सप्टेंबर रोजी पोलीस हवालदार हाजीमलंग शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत वांगी रोड परिसरातील मोकळ्या मैदानात चार संशयित इसम स्विफ्ट कार व दुचाकीसह थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. यावेळी संतोष राजाप्पा पाटील (वय ४४), महिबूब युसूफ विजापूरे, मल्लिकार्जुन बल्लप्पा शिवळ्ळी (वय ४२) आणि मंजुनाथ कल्याणराव निडोवे (वय ३५) या चौघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.आरोपींची कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून एक स्विफ्ट कार, एक मोटारसायकल, पाच मोबाईल फोन आणि ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण १४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख, अनिल जाधव, रामेश्वर साखरे, कल्लप्पा देखाणे, अभिजित पवार, निलोफर तांबोळी, तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे आणि बाळासाहेब काळे यांनी सहभाग घेतला.
0 Comments