सीएसआर उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत प्ले स्टेशनची सुविधा ; शारीरिक व मानसिक विकासाला मिळणार चालना
गादेगाव, ता. पंढरपूर : बालाजी अमाईन्सच्यावतीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, गादेगाव येथे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सर्वांगीण विकासासाठी सुमारे सात लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक खेळ साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसाठी मेरी-गो-राऊंड, सी-सॉ, स्विंग रायडर, स्प्रिंग रायडर, हॉर्स रायडर, सस्पेन्शन ब्रिज यांसह विविध खेळ साहित्य बसविण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत अशा आधुनिक पद्धतीचे प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य उपलब्ध होण्याचा हा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रकल्पाचे उद्घाटन बालाजी अमाईन्सचे सीएसआर विभागप्रमुख अनिल विपत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालाजी अमाईन्सचे परचेस मॅनेजर अमोल गुंड यांनी कंपनीच्या सीएसआर विभागामार्फत शिक्षण, आरोग्य व क्रीडा या क्षेत्रांना विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही प्रोत्साहन मिळावे, हा व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व संचालक मंडळाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत बागल गुरुजी यांनी या उपक्रमाबद्दल बालाजी अमाईन्सच्या व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व संचालक मंडळाचे आभार मानले. या खेळ साहित्यामुळे गादेगाव जिल्हा परिषद शाळेचे मैदान आता एखाद्या आधुनिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मैदानाप्रमाणे झाले असून, विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळांचा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बालाजी अमाईन्सच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासोबतच त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला, मानसिक विकासाला आणि आत्मविश्वासाला चालना मिळणार आहे. कंपनीच्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी स्वागत करून आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदचंद्र चाटे गुरुजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय बागल गुरुजी यांनी केले. यावेळी बालाजी अमाईन्सचे सीएसआर प्रमुख अनिल विपत, परचेस मॅनेजर अमोल गुंड, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments