सोलापूर (प्रतिनिधी)- तब्बल तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी शौएब रमजान शेख (वय 26, रा. घर नं. 1, मशीदजवळ, मुमताज नगर, सोलापूर) याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे 10 लाख 96 हजार रुपये किमतीचे 9 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2024 रोजी रात्री 10 ते 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंतच्या कालावधीत प्लॉट नं. 2, मुमताज नगर, सोलापूर येथील एका घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून सुमारे 96 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 82/2024, भादंवि कलम 380 अन्वये 29 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे व त्यांच्या पथकातील अंमलदार आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत सदर गुन्हा फिर्यादीच्या घराशेजारी राहणाऱ्या शौएब रमजान शेख याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी 23 सप्टेंबर 2026 रोजी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून चोरीस गेलेले 10,96,000 रुपये किमतीचे 9 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.या कारवाईमुळे मागील तीन वर्षांपासून उघडकीस न आलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास पूर्णत्वास गेला असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोउपनि मनोज मोरे तसेच पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, युवराज गायकवाड, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व चालक सतीश काटे यांनी केली.
0 Comments