स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; करमाळा रोडवर सापळा रचून आरोपीला पकडले.
सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत कुर्डूवाडी शहरात मेफेड्रोन (MD) विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. सोहेल अमर मुलाणी (वय 28, रा. खाटीक गल्ली, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून 63 ग्रॅम मेफेड्रोन (MD), होंडा BR-V चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन, असा एकूण 9 लाख 89 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
N-Cord बैठकीनंतर पोलिसांची कारवाई
अंमली पदार्थांच्या विक्री व तस्करीवर कडक कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर 18 सप्टेंबर 2026 रोजी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागांची N-Cord समितीची बैठक झाली होती. या बैठकीत जिल्ह्यात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. त्याचदरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (MD) ची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार सोहेल अमर मुलाणी हा करमाळा रोडमार्गे चारचाकी वाहनातून कुर्डूवाडी शहराच्या दिशेने (MD) घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
बौद्ध विहाराजवळ सापळा माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांना कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सहायक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांना पथकास मदत करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी करमाळा रोडवरून कुर्डूवाडी शहराकडे येणाऱ्या मार्गावरील बौद्ध विहाराजवळ पंचांसह सापळा रचला. काही वेळाने माहितीप्रमाणे एक संशयित चारचाकी वाहनातून कुर्डूवाडीच्या दिशेने येताना पोलिसांना दिसला.संशयित व्यक्ती सापळ्याच्या ठिकाणी जवळ येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव सोहेल अमर मुलाणी असल्याचे सांगितले.
63 ग्रॅम (MD) जप्त
पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 63 ग्रॅम मेफेड्रोन (MD) आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार या (MD) ची किंमत 1 लाख 89 हजार रुपये आहे.
याशिवाय गुन्ह्यात वापरलेले होंडा BR-V चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन, असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अशा प्रकारे या कारवाईत पोलिसांनी एकूण 9 लाख 89 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी सोहेल अमर मुलाणी याच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 426/2026 दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर NDPS Act 1985 मधील कलम 8(क) आणि 22(क) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 24 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गटकुळ, कुर्डूवाडी पोलीस ठाणे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस., करमाळा उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये सपोनि भीमगोंडा पाटील, सपोनि गटकुळ, पोलीस हवालदार सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, अनवर अत्तार, चापो कॉन्स्टेबल दिलीप थोरात, तसेच कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुशांत शिंदे, संतोष मोरे, महिला पोलीस हवालदार फुलन कस्तुरे, पोलीस कॉन्स्टेबल समीर पठाण आणि चापो कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे यांनी सहभाग घेतला.
अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून जनजागृतीसोबतच कारवाईची मोहीम सुरू असून, या कारवाईमुळे कुर्डूवाडी परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहारांवर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 Comments