Advertisement

Responsive Advertisement

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचे निधन



कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी; महाराष्ट्राच्या लोककला विश्वात शोककळा

अहिल्यानगर - प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या लोककलेचा मानबिंदू असलेल्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर (वय ६६) यांचे कर्करोगाशी सुरू असलेल्या लढ्यात निधन झाले. अहिल्यानगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि लावणी कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शकुंतला नगरकर यांचा जन्म १९६० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई छबूबाई नगरकर यादेखील त्या काळातील नामांकित लावणी कलावंत होत्या. घरातूनच लावणी कलेचा वारसा लाभलेल्या शकुंतलाताईंनी अवघ्या बाराव्या वर्षी घुंगरू बांधून कलाक्षेत्रात पदार्पण केले. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य नगरमध्ये गेले. पुढे पुणे, सोलापूर आणि बेळगाव या भागांत त्यांच्या कलेचा प्रवास विस्तारला.

बैठकीच्या लावणीवर विलक्षण प्रभुत्व

शकुंतला नगरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य लावणी कलेच्या संवर्धनासाठी आणि सन्मानासाठी समर्पित केले. पारंपरिक संगीत बारीतील बैठकीची लावणी, शृंगारिक अदा, डोळ्यांतील भावमुद्रा आणि नजाकत यांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या अदाकारीतून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडत असे.

१९७४ मध्ये मुंबईतील गिरणगावातील प्रसिद्ध लालबाग येथील हनुमान थिएटरमध्ये त्यांच्या लावणीच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने बहर आला. अनेक दशके त्यांनी आपल्या भारदस्त आवाजाने आणि प्रभावी अदाकारीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

शास्त्रोक्त नृत्याचे शिक्षण

शकुंतलाताईंनी केवळ पारंपरिक लावणी शैलीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता कथक गुरू वसंतराव घाटगे यांच्याकडून नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या बैठकीच्या लावणीला वेगळी कलात्मक उंची प्राप्त झाली.

पारंपरिक मंचासोबतच ‘लावणी के रंग’ आणि ‘लव्ह अँड लावणी’ यांसारख्या आधुनिक प्रयोगांद्वारे त्यांनी लावणी कलेला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम केल 

विविध पुरस्कारांनी सन्मान

लावणी कलेतील त्यांच्या मोलाच्या योगदानाची दखल घेत शासन आणि विविध संस्थांनी त्यांना प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले होते. यामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, २०१८ मधील मुंबई महापौर पुरस्कार आणि २०२३ मधील नाट्य गौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.

शकुंतला नगरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककलेतील एक समृद्ध पर्व संपले असून, त्यांच्या कलात्मक योगदानाची आणि लावणी कलेप्रती असलेल्या समर्पणाची आठवण रसिकांच्या मनात कायम राहील.

Post a Comment

0 Comments