Advertisement

Responsive Advertisement

दक्षिण सोलापूरला लवकरच नव्या एसटी बसेस; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन

मंद्रूप, प्रतिनिधी | दि. २३ सप्टेंबर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, भंडारकवठे, कंदलगाव, कुडल तसेच सीना-भीमा खोऱ्यातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मार्गांवर नवीन एसटी बसेस सुरू करण्याच्या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील आणि दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी परिवहनमंत्र्यांनी नवीन बससेवेबाबत आश्वासन दिले.

जुन्या बसगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय

मंद्रूप, भंडारकवठे, औज, कंदलगाव, औराद, हत्तरसंग आदी मार्गांवर जुन्या व मोडकळीस आलेल्या बसगाड्या धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे पंचाक्षरी स्वामी यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.

बससेवेतील अनियमित वेळापत्रक, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, खराब आसने, फुटलेल्या काचा आणि अस्वच्छता यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सकाळच्या बस दुपारी, तर दुपारच्या बस सायंकाळी धावत असल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्याची मागणी

विशेषतः परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना याबाबत सूचना देण्यात येतील, असे सांगितले. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याबरोबरच मंद्रूप, भंडारकवठे, कंदलगाव, कुडल आणि सीना-भीमा खोऱ्यातील विविध मार्गांवर लवकरच नवीन एसटी बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.

नवीन बससेवा सुरू झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments