Advertisement

Responsive Advertisement

*दक्षिण सोलापूरमध्ये RTI विषयी अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती*

प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांचा अनोखा उपक्रम; कार्यशाळा-प्रश्नमंजुषेतून माहिती अधिकाराची गोडी

 दक्षिण सोलापूर - प्रतिनिधी : माहितीचा अधिकार कायद्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण व्हावी, तसेच नागरिकांना माहिती देताना पारदर्शकता आणि सहकार्याची भूमिका वाढावी, या उद्देशाने दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी अनोखा उपक्रम राबविला. माहिती अधिकार दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी RTI विषयावरील कार्यशाळा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

माहितीचा अधिकार कायदा हा नागरिकांना शासकीय कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारे महत्त्वाचे माध्यम आहे. या कायद्याची उद्दिष्टे, अर्ज प्रक्रिया, माहिती देण्याची कालमर्यादा, जनमाहिती अधिकाऱ्यांची भूमिका तसेच पारदर्शक प्रशासनासाठी RTI चे महत्त्व याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

 *“RTI अर्जाकडे केवळ अर्ज म्हणून न पाहता, प्रशासन अधिक पारदर्शक करण्याचे माध्यम म्हणून पाहिले पाहिजे,”* या भूमिकेतून अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कायद्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे *गटविकास अधिकारी मनोज राऊत* यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात मनीषा वास्ते, गिरीषचंद्र वाघमारे, ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, सुरेश राठोड, समीर शेख, मृणालिनी शिंदे, संदीप घोडके, शहानवाज शेख, बसवराज बिराजदार* यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 *प्रशासनात पारदर्शकता आणणे गरजेचे* 

“प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि शासकीय कामकाज जनतेसाठी खुले करणे, हा माहिती अधिकार कायद्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. कायद्यानुसार मागितलेली माहिती देण्याची प्रक्रिया आणि कालमर्यादा यांचे पालन करणे आवश्यक आहे. माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाकडून माहिती मिळवून देणारा महत्त्वाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे माहिती अधिकाराच्या अर्जांकडे सकारात्मक आणि सहकार्याच्या भूमिकेतून पाहणे गरजेचे आहे. कार्यालयातील नियम, योजना आणि आवश्यक माहिती वेबसाईट तसेच सूचना फलकावर अद्ययावत ठेवण्यावरही भर दिला पाहिजे.”

 *अविनाश गोडसे, प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर*

Post a Comment

0 Comments