सोलापूर - प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यात्रेला आठवडा उलटत नाही तोच सोलापूर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला नेत्या विद्या लोलगे यांनी जिल्हा रुग्णालयातील बंद असलेल्या डायलिसिस सेंटरचा प्रकार उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे, आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान रुग्णालयातील सर्व सुविधा व्यवस्थित असल्याचे चित्र दाखवण्यात आले; मात्र प्रत्यक्षात डायलिसिस सेंटर बंद असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर सोलापूर दौऱ्यावर आले असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, महिला ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. जयश्री ढवळे आणि आरोग्य अधिकारी डॉ. कोपुरवाड यांनी जय्यत तयारी केली होती. मंत्र्यांना नव्याने बांधण्यात आलेले कॅथलॅब आणि आयसीयू दाखवण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली नाही, असा आरोप विद्या लोलगे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, त्याच दिवशी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध वॉर्डची पाहणी केली होती. रुग्णांशी संवाद साधत आरोग्य सुविधांचा आढावा घेतला होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद असल्याची माहिती दोन्ही मंत्र्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे आता समोर आले आहे.
२ नोव्हेंबरपासून डायलिसिस सेंटर बंद!
जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर २ नोव्हेंबरपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डायलिसिस उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयातील मोफत डायलिसिस सेवा बंद असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला नेत्या विद्या लोलगे बुधवारी सकाळी एका रुग्णाची भेट घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्या असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. डायलिसिससाठी आलेल्या जवळपास ५० ते ६० रुग्णांना उपचार न मिळाल्याने परत जावे लागल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
रुग्णांचा वाढता रोष पाहता जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी याबाबत अधिकृत माहिती देताना डायलिसिस सेंटर लवकरच सुरू करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, हे सेंटर नेमके कधी सुरू होणार, तोपर्यंत डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांनी उपचार कुठे घ्यायचे, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
या वेळी सी. ए. बिराजदार आणि शिवसेना महिला नेत्या अरुणा बेंजरपे उपस्थित होत्या.
तानाजी सावंत यांच्या काळात उद्घाटन; आता सुविधा बंद
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले होते. त्यांच्याच कार्यकाळात रुग्णालयाचे उद्घाटनही करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने शासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जाते.
मात्र, प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालयातील अनेक सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. थाटामाटात उद्घाटन करण्यात आलेल्या विविध विशेष वॉर्डच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही सुविधा आवश्यक अनुदानाअभावी ऑक्सिजनवर सुरू असल्याचा आरोप होत आहे.
मोफत डायलिसिस सेवेवर अनिश्चिततेचे सावट
जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरबाहेर मोफत डायलिसिस सेवा अनिश्चित काळासाठी बंद असल्याचा फलक लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळतील या अपेक्षेने येणाऱ्या रुग्णांना उपचार न मिळाल्याने खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या रुग्णांसाठी हा मोठा आर्थिक आणि आरोग्यविषयक प्रश्न आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जिल्हा रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली गेली होती का? डायलिसिस सेंटर २ नोव्हेंबरपासून बंद असताना ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास का आणून देण्यात आली नाही? रुग्णालयातील महत्त्वाच्या आरोग्य सुविधा बंद असताना त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत.
आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रकरणाची दखल घेऊन डायलिसिस सेंटर तातडीने सुरू करण्यासाठी काय पावले उचलतात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. तसेच डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांना तातडीने पर्यायी उपचार व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे.
0 Comments