करमाळा - प्रतिनिधी : उजनी जलाशयात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. कीर्ती रामचंद्र ढावरे (वय २६, रा. वांगी नं. १, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा गळा आवळून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी जलाशयात फेकून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भगवान महादेव कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आठ जिल्ह्यांमध्ये पथके रवाना करून, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करमाळा पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.
नेमकी घटना काय?
दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील मौजे बिटरगाव (वांगी) शिवारात नागनाथ राखुंडे यांच्या शेताजवळ उजनी जलाशयामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. अंदाजे २६ ते २८ वर्षे वयोगटातील ही महिला ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत होती. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली. सुरुवातीला करमाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १२९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली.
मृत महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मृतदेहाची ओळख पटवून तिच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास मोहीम हाती घेतली.
८ जिल्ह्यांत ५ पोलीस पथके रवाना
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी पाच विशेष पथके तयार केली.
या पथकांना सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, पुणे ग्रामीण, पुणे शहर, अहिल्यानगर, धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तपासासाठी रवाना करण्यात आले. संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून बेपत्ता महिलांची माहिती घेण्यात आली. मृत महिलेचे छायाचित्र आणि वर्णन विविध ठिकाणी पाठवून तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.
लाँचच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी उजनी जलाशय परिसरातील बंडगर वस्ती, ढोकरी ते शहा (ता. इंदापूर) या भागात विशेष चौकशी केली. या मार्गावर लाँच आणि बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे तसेच मासेमारी करणाऱ्या नागरिकांकडे मृत महिलेचे वर्णन सांगून माहिती घेण्यात आली.
या चौकशीदरम्यान पोलिसांना एका महिलेबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित लाँच आणि बोटींच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. या फुटेजमध्ये दिसणाऱ्या महिलेच्या अंगावरील कपडे आणि उजनी जलाशयात आढळलेल्या मृत महिलेच्या अंगावरील कपडे एकसारखे असल्याचे दिसून आले. या महत्त्वपूर्ण धाग्यामुळे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली.
मृत महिलेची ओळख पटली
सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिलेबाबत अधिक चौकशी केली. त्यामध्ये तिचे नाव कीर्ती रामचंद्र ढावरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाइकांचा शोध घेतला असता तिची आई रूपाली सुखदेव चांदणे या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी कांदलगाव येथे जाऊन तिच्या आईकडे चौकशी केली. त्यांनी मृत महिला ही आपली मुलगी कीर्ती असल्याचे ओळखून सांगितले. त्यानंतर मृत महिलेची अधिकृत ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
पूर्वीच्या बलात्काराच्या गुन्ह्याची माहिती तपासात उघड
मृत कीर्ती ढावरे हिने वांगी गावातील भगवान महादेव कांबळे याच्याविरुद्ध यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान मिळाली. संबंधित गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात असल्याची बाबही तपासात समोर आली.
दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी बलात्काराचा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी फिर्यादी आणि मृत महिलेला धमकी दिल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात भगवान कांबळे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या सर्व बाबींचा विचार करून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह उजनी जलाशयात टाकल्याचा आरोप भगवान कांबळे याच्यावर करण्यात आला आहे.
आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल
मृत महिलेची आई रूपाली सुखदेव चांदणे (रा. कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १००३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २३८(अ), २३८(ब) आणि ३५१(२) प्रमाणे दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
अवघ्या २ तासांत आरोपीला अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी भगवान महादेव कांबळे याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी स्वतंत्र पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांच्यासह अधिकारी आणि अंमलदारांना तपासाबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपलब्ध माहिती, तांत्रिक तपास आणि विविध ठिकाणी केलेल्या चौकशीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी अवघ्या २ तासांत भगवान महादेव कांबळे याला शोधून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पोलीस हवालदार दुष्यंत ढेंबरे, अलिम मलिक शेख, मयूर गव्हाणे, पोलीस नाईक चंद्रकांत गोरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, अर्जुन गोसावी, योगेश येवले, अमोल बागल तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जहीरान नाईकवाडी यांचा सहभाग होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत. अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यापासून ते संशयित आरोपीला अटक करण्यापर्यंत करमाळा पोलिसांनी केलेल्या तपासामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
0 Comments