Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर जिल्ह्यात जलसंधारणासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेचे रणशिंग; गावागावांत श्रमदानातून उभारणार जलचळवळ !सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२६-२७ मध्ये जास्तीत जास्त गावांनी सहभागी व्हावे; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन


सोलापूर - प्रतिनिधी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून गावागावांत पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२६-२७ च्या माध्यमातून पाणी फाउंडेशनच्या पुढाकाराने जिल्ह्यात जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी होऊन श्रमदानातून जलसंधारणाची कामे पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२६-२७ च्या अनुषंगाने जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी पाणी फाउंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, राज्य समन्वयक सत्यवान देशमुख, जिल्हा समन्वयक सुशांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक लांडगे, उपअभियंता रामचंद्र क्षीरसागर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जलसंधारणासाठी पाणी फाउंडेशनने पुढाकार घेतल्याबद्दल कुशल जैन यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. गावपातळीवर ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळवून श्रमदानातून जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गावांची निवड आणि प्रशिक्षणार्थींची भूमिका महत्त्वाची : डॉ. अविनाश पोळ

बैठकीत पाणी फाउंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी वॉटर कप स्पर्धेचे स्वरूप, मूल्यमापनाचे निकष आणि जलसंधारणासाठी करावयाच्या विविध कामांची सविस्तर माहिती दिली. या स्पर्धेत जलसंधारणाच्या कामांना ७० टक्के, तर गटशेती या निकषाला ३० टक्के असे एकूण १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेसाठी गावांची निवड करण्याबरोबरच गावातील पाणी आणि जलसंधारणाविषयी जागरूक असलेल्या नागरिकांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी गावांची तसेच प्रशिक्षणासाठी योग्य नागरिकांची निवड काळजीपूर्वक करावी. गावाच्या जलसंधारण चळवळीत मनापासून योगदान देण्याची इच्छाशक्ती असलेल्या नागरिकांना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण डिसेंबर २०२६ अखेर किंवा १५ जानेवारी २०२७ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे डॉ. पोळ यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षणानंतर गावातील शिवार फेरीला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. या फेरीत गावातील पाण्याचे स्रोत, पाणलोट क्षेत्र, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि जलसंधारणासाठी आवश्यक कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार गावनिहाय जलसंधारणाचे नियोजन करण्यात येईल.

७६ तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून २०१६ पासून महाराष्ट्रात लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची कामे राबविण्यात येत आहेत. आजपर्यंत राज्यातील ७६ तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. ग्रामस्थांना एकत्र आणून गावपातळीवर जलसंधारणाची चळवळ उभी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता गावाच्या भविष्यातील पाणी नियोजनाची संधी म्हणून पाहावे. जास्तीत जास्त गावांनी सहभागी होऊन कायमस्वरूपी जलसंधारणाच्या उपाययोजना राबवाव्यात. शासन, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी निश्चितच मदत होईल, असे आवाहन डॉ. अविनाश पोळ यांनी केले.

प्रारंभी पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुशांत गायकवाड यांनी फाउंडेशनच्या कामकाजाची आणि जलसंधारण उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून सोपविण्यात आली आहे.

लोकसहभाग, श्रमदान आणि प्रशासनाचा समन्वय यांच्या बळावर सोलापूर जिल्ह्यातील गावांना पाणीदार करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ गतिमान होणार आहे.

Post a Comment

0 Comments