Advertisement

Responsive Advertisement

जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या हस्ते ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव-२०२६’चे उद्घाटन,२५ महिला बचत गटांचा सहभाग; ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना मिळाली हक्काची बाजारपेठ

सोलापूर - प्रतिनिधी : ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह महिला उद्योजिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आवारात आयोजित करण्यात आलेल्या ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव-२०२६’चे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) उत्साहात करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आणि कष्टाला बाजारपेठ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवात सुकामेवा, दिवाळी फराळ, हस्तकला साहित्य, पणत्या, आकाशकंदील तसेच विविध गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. फटाके वगळता दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील एकूण २५ महिला स्वयंसहायता समूहांनी या महोत्सवात सहभाग घेतला असून, त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी आकर्षक स्टॉल उभारण्यात आले आहेत. उद्घाटनानंतर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन उत्पादनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध वस्तूंची खरेदी करत महिला बचत गटांच्या उत्पादनांचे आणि महिला उद्योजिकांच्या कार्याचे कौतुक केले.

या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ होण्यासह महिलांमध्ये उद्योजकता, स्वावलंबन आणि आर्थिक आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच सोलापूर शहरातील नागरिकांनाही स्थानिक महिला बचत गटांनी तयार केलेले दर्जेदार दिवाळी साहित्य आणि फराळाचे पदार्थ खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.

‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव-२०२६’ हा केवळ खरेदी-विक्रीचा उपक्रम नसून ग्रामीण संस्कृती, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन आणि महिला सक्षमीकरणाचा संगम ठरत आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, प्रकल्प संचालक जगताप, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

महोत्सवाचे ठिकाण : जिल्हा परिषद आवार, सोलापूर

कालावधी : २ व ३ नोव्हेंबर २०२६

वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

Post a Comment

0 Comments