Advertisement

Responsive Advertisement

दया संस्थेचा वार्षिक मेळावा उत्साहात संपन्न गुणवंत विद्यार्थी व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव; तक्षशिला अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

पंढरपूर - प्रतिनिधी (भाळवणी) : येथील डॉक्टर आंबेडकर युथ असोसिएशन (दया) मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणवंत विद्यार्थी-पालक गुणगौरव समारंभ मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दया संस्थेच्या वतीने मागील चार वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी तक्षशिला अभ्यासिका हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या अभ्यासिकेत सध्या ४० हून अधिक विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करीत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काचे व पोषक वातावरण उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या यशाचे कौतुक व्हावे, या उद्देशाने संस्थेच्या वतीने गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दहावी, बारावी, शालेय शिक्षण, क्रीडा आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पालकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच त्रिशरण-पंचशील ग्रहणाने झाली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. अरुण भोसले, अध्यक्ष प्रा. नंदकुमार उबाळे, उपाध्यक्ष जालिंदर गायकवाड, सचिव मारुती भोसले, खजिनदार पवन सातपुते, प्रा. डॉ. शाहीर गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सुनील गायकवाड आणि पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष नवनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य सुनील गायकवाड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दया संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेला तक्षशिला अभ्यासिकेचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व आदर्शवत असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच भविष्यात अभ्यासिकेच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक MPSC परीक्षेतून महसूल सहाय्यकपदी निवड झालेले शिलधन भोसले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अमोल उबाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष जालिंदर गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणारा आणि पालकांच्या योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments