Advertisement

Responsive Advertisement

मंद्रूप पोलीस स्टेशनचे धडाकेबाज कामगिरी! साध्या वेशातील DYSP पथकाचा कंदलगावात छापा; सव्वा लाखाचा गुटखा जप्त, दुकानदार अटकेत


३,६०० माव्याच्या पुड्यांसह १ लाख २८ हजार ९८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर प्रतिनिधी : कंदलगाव : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि माव्याचा विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी किराणा दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. मंद्रूप पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ३,६०० माव्याच्या पुड्यांसह एकूण १ लाख २८ हजार ९८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विश्वनाथ नागप्पा कोरे (वय ४५, रा. कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, मंद्रूप पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक (DYSP) गणेश शिंदे यांना कंदलगाव येथील एका दुकानात प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास DYSP गणेश शिंदे, पोलीस शिपाई अश्पाक मियावाले आणि त्यांच्या पथकाने साध्या वेशात संबंधित दुकानावर छापा टाकला.

यावेळी समर्थ किराणा दुकान आणि समर्थ किराणा जनरल स्टोअर येथे तपासणी केली असता, विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेले प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

विविध कंपन्यांच्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

या कारवाईत विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, शट लक्झरी च्युइंग टोबॅको, गोवा १०००, एसपी ९९९ टोबॅको, केसरयुक्त हाय, आरएमडी पानमसाला तसेच सुमारे ३,६०० माव्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख २८ हजार ९८६ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची फिर्याद

महाराष्ट्र शासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विश्वनाथ कोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे रामानंद स्वामी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. मंद्रूप पोलीस ठाण्याचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी गुन्हा दाखल केला असून, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments