उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते उद्घाटन ; सचिव अरुण धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
सोलापूर (प्रतिनिधी) : श्री मंगलदास क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळा, मजरेवाडी, सोलापूर येथे संस्थेचे सचिव अरुण धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, नेत्रदान जनजागृती आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागृती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपल्या मनोगतात वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक तसेच सामाजिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल विश्वास व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. वैभव राऊत यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच नेत्रदानाचे महत्त्व समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष अशोक उमाप यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमातून पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि आरोग्याबाबत सजग राहण्याचा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनावर भर
महानगरपालिकेच्या नगरसेविका सुमन जीवन चाबुकस्वार आणि संस्थेचे सचिव अरुण धोत्रे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनावे, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून शासकीय अथवा खासगी क्षेत्रात नोकरी मिळवावी आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी संस्था सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
मजरेवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा सरोदे यांनी आरोग्याचे महत्त्व विशद करत प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची नियमित काळजी घ्यावी, असे आवाहन केले. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला नेत्रतज्ज्ञ डॉ. मल्लिनाथ जेऊरे, वृक्ष संवर्धन समितीचे मनोज देवकर, सामाजिक कार्यकर्ते महेश देवकर, संस्थेच्या खजिनदार शोभा अरुण धोत्रे, पत्रकार डॉ.राम हुंडारे, विशाल पाटील, मुल्ला, सत्यम गायकवाड, गौतम थापटे, नरेंद्र धोडमणी, बसवराज जेऊरे आणि महबूब बडेखान उपस्थित होते.
तसेच गौरी धोत्रे, शकुंतला धोत्रे, स्टाफ नर्स निलोफर शेख, आरोग्य सेविका वंदना कांबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ भीमाशंकर बावगे, औषध निर्माण अधिकारी जावेद शेख, आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
सचिव अरुण धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन, नेत्रदान जनजागृती, आरोग्यविषयक जागरूकता आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजयकुमार लोंढे यांनी केले.
0 Comments