जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त नॅबच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट..
सोलापूर - प्रतिनिधी : अंधत्वावर मात करून जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्नांच्या बळावर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत शिक्षणाधिकारी पदापर्यंत मजल मारणारे सोलापूरचे पहिले अंध शिक्षणाधिकारी सुजित शिंदे यांची नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) जिल्हा शाखा, सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या अपंग एकात्म विभागातील दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भेट घेतली. या भेटीत विद्यार्थ्यांनी शिंदे यांच्याशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या यशस्वी वाटचालीतून प्रेरणा घेतली.
सुजित शिंदे हे सध्या माध्यमिक शिक्षणाधिकारी (योजना), सोलापूर या पदावर कार्यरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीला अडथळा न मानता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांनी मिळविलेले यश दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाची माहिती जाणून घेताना विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि ध्येयपूर्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अनुभवता आले.
या उपक्रमास प्रशालेच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त आयोजित या आगळ्यावेगळ्या भेटीतून विद्यार्थ्यांना स्वावलंबन, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा संदेश देण्यात आला.
पांढरी काठी म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाचे प्रतीक.!
दृष्टिबाधित व्यक्तींना सुरक्षितपणे व स्वतंत्रपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी पांढऱ्या काठीच्या वापराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जागतिक पांढरी काठी दिन साजरा केला जातो. अमेरिकेत १९३० च्या दशकात पांढऱ्या काठीला विशेष ओळख मिळाली, तर १९६४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी १५ ऑक्टोबर हा दिवस पांढऱ्या काठीच्या सुरक्षित वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी घोषित केला.
पांढरी काठी हे केवळ चालण्याचे साधन नसून दृष्टिबाधित व्यक्तींच्या स्वातंत्र्याचे, आत्मविश्वासाचे आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. समाजाने दृष्टिबाधित व्यक्तींच्या क्षमतांना प्रोत्साहन देत त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी यावेळी केले.
या प्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.जोतिबा काटे, प्रा.अर्चना अडसूळ,सुभाष माने, भैरप्पा कारभारी,दिव्या साखरे यांच्यासह दृष्टिबाधित विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments