विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा; ग्रामीण नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना

सोलापूर - प्रतिनिधी : पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागनिहाय अहवालांचे सादरीकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे मार्गदर्शनही विभागीय आयुक्तांनी केले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित बैठकीत प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांच्या श्रेणीकरणासाठी निश्चित केलेल्या निकषांचा आढावा घेण्यात आला. तसेच महिला व बालविकास, आरोग्य आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली.

याशिवाय आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत अक्कलकोट आणि सांगोला तालुक्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. यावेळी सेवा संकल्प अभियानांतर्गत विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांच्या हस्ते आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.

विभागांनी आपल्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त नितीन माने, अप्पर आयुक्त प्रांजल शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सहाय्यक आयुक्त राजनंदिनी भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विजय धनवरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.