Advertisement

Responsive Advertisement

जुळे सोलापुरातील फ्लोरा फॅमिली स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा! : मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा आरोप


सोलापूर (प्रतिनिधी)- जुळे सोलापूर येथील सी.बी.सी. बिल्डिंगमधील फ्लोरा फॅमिली स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिला आढळून आल्या असून, स्पा सेंटरचा चालक अजय बापू कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळे सोलापूर येथील सी.बी.सी. बिल्डिंगमधील गाळा क्रमांक २००७ व २००८ येथे फ्लोरा फॅमिली स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर संबंधित पथकाने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह संयुक्तपणे छापा टाकला.

या कारवाईदरम्यान दोन पीडित महिला आढळून आल्या. स्पा सेंटरचा चालक अजय बापू कांबळे (वय २७, रा. पत्रा तालीम, शिवमंदिराजवळ, उत्तर कसबा, सोलापूर) हा महिलांकडून मसाज करून घेतल्यानंतर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील महिला ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अलका अनिल शहापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६६/२०२६ नुसार अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १४३(२) आणि १४४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आरोपीला १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

बेकायदेशीर व्यवसायाची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन

मसाज सेंटरच्या नावाखाली अशा प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदनशिव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस हवालदार हाजीमलंग शेख, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अलका शहापुरे, महिला पोलीस हवालदार अकिला नदाफ, पोलीस नाईक सत्तार पटेल, महिला पोलीस कर्मचारी सीमा खोगरे, उषा मळगे, महिला पोलीस हवालदार परब तसेच चालक पोलीस कर्मचारी दादा गोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments