Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

उपळाई ठोंगे, पानगाव येथे सोयाबीन व तूर पिकांच्या नुकसानीची पाहणी; जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळग्रस्त, १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

सोलापूर (प्रतिनिधी) : पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे झालेले नुकसान आणि दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन पथकाने बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे व पानगाव येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पावसाअभावी जळून गेलेली सोयाबीनची पिके, तूर पिकांची स्थिती आणि पानगाव येथील पूर्णपणे कोरडा पडलेला साठवण तलाव यांची पाहणी करण्यात आली. पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक नुकसानीची माहिती घेतली. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, सध्या १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी यांनी केले. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश होता. कृषी आयुक्त सूरज मांढरे हेदेखील या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.

पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट

पानगाव येथे केंद्रीय पथकाने पावसाअभावी जळून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकरी आनंद धनंजय मोरे यांच्याशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, शेतीसाठी झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याबाबत माहिती घेण्यात आली.

चांगला पाऊस झाला असता, तर सोयाबीन पिकातून हेक्टरी ५० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र, पावसाअभावी पीक पूर्णपणे नष्ट झाले असून, जळालेले सोयाबीन जनावरेही खात नसल्याची व्यथा शेतकरी मोरे यांनी पथकासमोर मांडली.


त्यानंतर पथकाने पानगाव येथील साठवण तलावाची पाहणी केली. हा तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याचे निदर्शनास आले. पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईची तीव्रता या परिस्थितीतून स्पष्ट होत असल्याची माहिती प्रशासनाने पथकाला दिली.

चार एकरांतील सोयाबीनचे नुकसान; एकरी २० ते २५ हजारांचा खर्च

उपळाई ठोंगे येथे श्रीमती लता शेळवणे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. त्यांचे बंधू कल्याण चव्हाण यांनी पथकाला पीक नुकसानीची माहिती दिली.


चार एकर क्षेत्रात सोयाबीनचे पीक घेण्यासाठी प्रति एकर २० ते २५ हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र, पावसाअभावी पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पथकाने पेरणीपासून झालेला पाऊस, पावसातील खंड, पिकांची वाढ, गावातील एकूण पेरणी क्षेत्र, सोयाबीन व इतर पिकांचे क्षेत्र, आंतरपीक पद्धती आणि भूजल पातळी याबाबत सविस्तर माहिती घेतली. जनावरांसाठी चारा उपलब्धतेची स्थिती जाणून घेत चारा डेपो सुरू करणे किंवा चारा छावण्या उभारणे यापैकी कोणता पर्याय अधिक उपयुक्त ठरेल, याबाबतही शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली.

पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करणार

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केंद्रीय पथकाला सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीची व्याप्ती आणि पाणीटंचाईबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, सध्या १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पीक नुकसानीचे आतापर्यंत ६० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

बार्शी तालुक्यात पावसाची ४४.८३ टक्के तूट

प्रशासनाने केंद्रीय पथकासमोर सादर केलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यात एकूण १३८ गावे असून, तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ५० हजार ३१६ हेक्टर आहे. पेरणी क्षेत्र १ लाख ३६ हजार ५४६ हेक्टर असून, सरासरी खरीप पेरणी क्षेत्र ७३ हजार १७७ हेक्टर आहे. यंदा प्रत्यक्षात १ लाख १ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सोयाबीन, तूर आणि उडीद ही तालुक्यातील प्रमुख खरीप पिके आहेत. तसेच द्राक्षे आणि कागदी लिंबू ही प्रमुख फळपिके आहेत.

तालुक्यात सरासरी ५२८.१० मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २९१.३४ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसात ४४.८३ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे. याशिवाय २१ ते ४४ दिवसांचा पावसातील खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला आहे.

या परिस्थितीमुळे बार्शी तालुक्यातील सर्व १३८ गावे आणि १ लाख १२ हजार २२६ हेक्टर क्षेत्र दुष्काळबाधित झाले आहे. पीक नुकसानीची ७३ हजार ४२४ हेक्टर क्षेत्रावरील, म्हणजेच ६५.४२ टक्के क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने केंद्रीय पथकाला दिली.

पाहणीच्या आधारे केंद्र शासनाला अहवाल

या दौऱ्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, तहसीलदार एफ. आर. शेख, मृद व जलसंधारण विभागाचे रामचंद्र क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी संतोष कोल्हे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

प्रत्यक्ष शेतपाहणी, शेतकऱ्यांशी झालेला संवाद आणि संबंधित विभागांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय पथक केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीची तीव्रता आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या मदतीबाबत पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments