Advertisement

Responsive Advertisement

यशवंत पाध्ये राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर !विक्रमबापू खेलबुडे यांना सन्मान; विविध विभागांतील पत्रकारांचाही गौरव

सोलापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या यशवंत पाध्ये राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ‘संचार’चे उपसंपादक विक्रमबापू खेलबुडे यांना जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
राज्यातील विविध विभागांतून उत्कृष्ट पत्रकारितेसाठी निवड झालेल्या पत्रकारांमध्ये नंदकिशोर पाटील (दैनिक लोकमत, छत्रपती संभाजीनगर), विलास मराठे (दैनिक हिंदुस्थान, अमरावती), निखिल पंडितराव (दैनिक सकाळ, कोल्हापूर), सुनील जावडेकर (दैनिक पुण्यनगरी, ठाणे-पालघर), सतीश वैजापूरकर (दैनिक सकाळ, शिर्डी-अहिल्यानगर), संजीव कुलकर्णी (दैनिक पुढारी, नांदेड) आणि डी. जे. गुरव (दैनिक लोकशाही, जळगाव) यांचा समावेश आहे.

याशिवाय ‘दैनिक प्रहार’चे संपादक पद्मभूषण देशपांडे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून हजारो रुग्णांना मदत करणारे पत्रकार मंगेश चिवटे यांनाही विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. लवकरच राज्यातील विविध विभागांमध्ये मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने देण्यात आली.

या पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, सचिव एकनाथ बिरवटकर, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, उपाध्यक्ष सुधीर जाधव, खजिनदार दीपाताई पाध्ये यांच्यासह गजानन चव्हाण, गोरख तावरे, अरुण सुरवाडकर, धोंडूपंत विष्णुपुरीकर, राजेंद्र मोहिते आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व पत्रकारांचे पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments