मंदिर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी; सोलापूरकरांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा.
सोलापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त सोलापूर शहराचे आराध्य दैवत श्री रूपाभवानी देवीचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सहपत्नीक दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी धनश्रीताई कोंड्याल उपस्थित होत्या. त्यांनी सोलापूर शहरातील नागरिकांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी श्री रूपाभवानी देवस्थानचे ट्रस्टी मल्लिनाथ मसरे यांनी महापौर विनायक कोंड्याल व धनश्रीताई कोंड्याल यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
शारदीय नवरात्रोत्सवात श्री रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून तसेच परजिल्ह्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरातील सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांनी मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांची सुरक्षितता, मंदिर परिसरातील देखरेख आणि गर्दीच्या काळात सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
श्री रूपाभवानी देवी हे सोलापूरकरांचे श्रद्धास्थान असून, नवरात्रोत्सव हा भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव आहे. या पवित्र पर्वानिमित्त महापौर विनायक कोंड्याल यांनी समस्त सोलापूरकरांना नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. देवीच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो, तसेच सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा आणि गती मिळो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी देवस्थानचे ट्रस्टी मल्लिनाथ मसरे, नागेश सरगम, प्रकाश वाले, नगरसेवक अक्षय आजीखाने, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, हेमंत पिंगळे, सारंग मसरे, मनीष मसरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
0 Comments