सोलापूर - प्रतिनिधी : रेशन दुकानातून मोफत किंवा सवलतीच्या दरात धान्य मिळविणाऱ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या ‘मिशन सुधार’ उपक्रमांतर्गत रेशनकार्डधारकांच्या पात्रतेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांचे रेशन धान्य बंद केले जाणार आहे.
शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ५९ हजार रुपये, तर ग्रामीण भागासाठी ४४ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच शहरातील लाभार्थ्यांचे दररोजचे उत्पन्न १६२ रुपयांपेक्षा आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे उत्पन्न १२१ रुपयांपेक्षा अधिक नसावे.
या निकषांनुसार सोलापूर शहरातील सुमारे ५३ हजार लाभार्थी अपात्र ठरले आहेत. यामध्ये उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेले, प्राप्तिकर भरणारे, बनावट किंवा दुबार रेशनकार्डधारक तसेच चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थ्यांचा समावेश आहे.
याशिवाय सलग तीन ते सहा महिने रेशन दुकानातून धान्य न घेणाऱ्या लाभार्थ्यांचीही तपासणी केली जात आहे. अशा अपात्र लाभार्थ्यांचे धान्य कायमस्वरूपी बंद केले जाणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली.
दरम्यान, यंदा दिवाळीत रेशनकार्डधारकांना दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नसल्याचे संकेत आहेत. मात्र अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा एक किलो साखर दिली जाणार आहे.
रेशनकार्डधारकांनी आपल्या पात्रतेची माहिती संबंधित रेशन दुकानदार किंवा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून तपासून घ्यावी.
0 Comments