Advertisement

Responsive Advertisement

महाराष्ट्रासह तेलंगणात गुन्हे दाखल असलेला पाहिजे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई; दरोडा प्रकरणातील आरोपी जेरबंद, ४८ किलो कॉपर वायर जप्त

सोलापूर - प्रतिनिधी : जिल्ह्यातील घरफोडी व दरोड्याच्या गुन्ह्यांचा तपास करून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेण्याच्या अनुषंगाने सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. मोहोळ पोलीस ठाण्यातील दरोडा प्रकरणातील पाहिजे आरोपी सचिन उर्फ सच्या अभिमान ऊर्फ अभिमन्यू काळे (वय ३२, रा. एकतानगर, सापगरूड गल्ली, जत, जि. सांगली; सध्या रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील घरफोडी व दरोड्याच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, सोलापूर उपविभागात पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय बातमीदारामार्फत मोहोळ पोलीस ठाण्यातील दरोडा गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ येथील वैरागकडे जाणाऱ्या पुलाखाली संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला. संशयित व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सचिन उर्फ सच्या अभिमान ऊर्फ अभिमन्यू काळे असल्याचे सांगितले. पोलिसांच्या चौकशीत त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासात आरोपीविरुद्ध मोहोळ, बार्शी तालुका, वैराग व कामती पोलीस ठाण्यांसह तेलंगणातील महेबुबनगर ग्रामीण आणि महेबुबनगर शहर पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांनुसार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीच्या ताब्यातून ४८ किलो कॉपर वायर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार सलीम बागवान, हरिदास पांढरे, विरेश कलशेट्टी, नागेश कोणदे, व्यंकटेश मोरे, जगदीश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार, योगेश जाधव, कपिल काटकर, सुनील पवार, अशोक हलसंगी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनंदा झळके, पल्लवी इंगळे-पाटील तसेच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश नाळे आदीनी यशस्वीरित्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments