Advertisement

Responsive Advertisement

सोलापुरात लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणारे आंतरजिल्हा मॅट्रिमोनी रॅकेट उघडकीस; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


२ लाख १७ हजार ५०० रुपये रोख, एक लाख रुपये आणि दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास; पुणे, जालना व सोलापूर जिल्ह्यातून आरोपी ताब्यात

सोलापूर प्रतिनिधी : लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची आर्थिक फसवणूक करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा मॅट्रिमोनी रॅकेटचा विजापूर नाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी चार स्वतंत्र पथके तयार करून ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातील गुरुदत्त नगर, सैफुल विजापूर रोड येथे राहणारे सूरज संजय पवार (वय ३१, व्यवसाय-ड्रायव्हर) यांना आरोपींनी विश्वासात घेतले. योगिता दत्तात्रय सूर्यवंशी हिच्याशी लग्न लावून देण्याचे आश्वासन देत एजंट फी च्या नावाखाली वेळोवेळी त्यांच्याकडून २ लाख १७ हजार ५०० रुपये घेतल्याचा आरोप आहे.

त्यानंतर योगिता सूर्यवंशी ही लग्न झाल्याचे सांगून पवार यांच्या घरी राहण्यास आली. मात्र, मासिक पाळी आणि धार्मिक कार्यक्रमाचे कारण सांगून तिने पतीसोबत एकत्र येण्याचे टाळले. या काळात तिने घरातील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची माहिती मिळविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, सूरज पवार हे त्यांच्या बहिणीला पंढरपूर येथे सोडण्यासाठी गेले असताना योगिता सूर्यवंशी हिने घरातील एक लाख रुपये रोख आणि लग्नात वापरलेले तसेच त्यांच्या आईचे मिळून सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी एजंट ज्योती धनंजय लोंढे, सचिन शिंदे, योगिता दत्तात्रय सूर्यवंशी, सुनिता सुनील दाभाडे, दत्तात्रय सूर्यवंशी आणि कैलास शिंदे या सहा जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(२), ३१८(४), ३१६(२) आणि ६१(२)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार पथकांकडून तपास; मुद्देमाल हस्तगत

दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाला वेग दिला. चार स्वतंत्र पथके तयार करून पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून गुन्ह्याशी संबंधित काही मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

हे मॅट्रिमोनी रॅकेट आंतरजिल्हा स्तरावर कार्यरत असल्याचा संशय असून, आरोपींचे परस्पर संबंध आणि अन्य गुन्ह्यांतील संभाव्य सहभाग याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर आणि सहायक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशांत वराळे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे, तसेच सफौ आप्पा पवार, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रश्मी जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिर्के आणि पोलीस अंमलदार सनी राठोड, श्रीरंग काशीद, रमेश कोर्सेगाव, राजू पवार, संतोष चानकोटी व महिला पोलीस अंमलदार स्वाती भोसले यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments