Advertisement

Responsive Advertisement

ब्रेकिंग न्यूज : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक मात्र सुरूच राहणार !


उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आणि नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणुकीला स्थगिती नाही; निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांची माहिती

सोलापूर - प्रतिनिधी : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयातून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वगळण्यात आल्याने बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.

राज्य शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३क क मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि इतर नागरिक बाधित झाल्याने अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे लोकहिताचे ठरणार नाही, या विचारातून शासनाने हा आदेश जारी केला आहे.

शासनाच्या आदेशानुसार, दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर आहेत, त्याच टप्प्यावरून पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येणार आहेत. मात्र, सहकारी गृहनिर्माण संस्था, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या निवडणुका तसेच आदेश जारी होण्यापूर्वी नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झालेल्या संस्थांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक सुरूच

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. तसेच निवडणुकीच्या नामनिर्देशन अर्जांची विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया तीन दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. त्यामुळे शासनाच्या नव्या आदेशाचा या निवडणुकीवर परिणाम होणार नसून निवडणुकीची पुढील प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार सुरू राहणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थगिती मिळाली असली, तरी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments