सोलापूर - प्रतिनिधी : वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजू विद्यार्थ्यांसोबत वाटून घेत पत्रकार महावीर रणखांबे यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. स्वतः रक्तदान करून तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून त्यांनी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
पत्रकार महावीर रणखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अमोगसिद्ध लांडगे, विजयकुमार लोंढे, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाची सुरुवात रणखांबे यांनी मल्लिकार्जुन ब्लड बँकेत रक्तदान करून केली. रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यास त्यांचे प्राण वाचविण्यास मदत होते, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. यावेळी ब्लड बँकेचे सत्यम गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रणखांबे यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान केला.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि समाजात माणुसकीची भावना वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध घटकांना पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळते.
दरम्यान, पत्रकार महावीर रणखांबे यांचा वाढदिवस मित्रमंडळी व हितचिंतकांच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतही उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
वाढदिवस रक्तदानातून जीवनदानाचा संदेश देत आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत साजरा करण्याच्या रणखांबे यांच्या उपक्रमातून ‘सेवेतून आनंद आणि माणुसकीतून समाधान’ हा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचला.
0 Comments