एम.आय.डी.सी डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई; कोयते घेऊन दहशत माजविणारे दोघे जेरबंद
सोलापूर (प्रतिनिधी) : हातात धारदार कोयते घेऊन मोटारसायकलवरून दहशत माजवत फिरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सोलापूर शहरातील विविध भागांतून चोरी केलेल्या तब्बल ८ मोटारसायकलींचा छडा लागला. पोलिसांनी सुमारे ३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली हस्तगत करून चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कारवाई १ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधीनगर, अक्कलकोट रोड परिसरात करण्यात आली.
गांधीनगर परिसरात दोन इसम हातात कोयते घेऊन मोटारसायकलवरून आरडाओरड करीत दहशत निर्माण करत फिरत असल्याची माहिती बातमीदारामार्फत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयितांचा शोध सुरू केला.
दरम्यान, MH-13-FF-7053 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून दोन इसम हातात धारदार कोयते घेऊन फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे सैफन उर्फ सोहेल नुरोददीन बागवान (वय २७, रा. अक्कलकोट रोड, सोलापूर) आणि मोहन नागनाथ साळुंके (वय ४३, रा. सोलापूर) अशी सांगितली.
ताब्यातील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. तपासात सदर मोटारसायकल एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. ८६३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) मधील असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपींविरुद्ध शस्त्र कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आली.
चौकशीत आणखी सात मोटारसायकलींचा खुलासा
आरोपींना अटक करून पुढील तपास केला असता, मोहन साळुंके याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्याने साथीदार सैफन उर्फ सोहेल बागवान याच्यासोबत मिळून मागील दोन महिन्यांत सोलापूर शहरातील विविध ठिकाणांहून आणखी ७ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरी केलेल्या या मोटारसायकली अक्कलकोट रोडवरील राजीव नगर परिसरातील मैदानाजवळील पडीक इमारतीच्या परिसरातील झाडीझुडपात, नागरिकांच्या सहज नजरेस पडणार नाहीत अशा ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. आरोपींच्या माहितीवरून पोलिसांनी त्या सातही मोटारसायकली जप्त केल्या.
अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ८ मोटारसायकली हस्तगत करून ८ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ३ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आठ चोरीच्या वाहनांचा छडा
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांतील मोटारसायकलींचा समावेश आहे. त्यामध्ये MH-13-FF-7053, MH-13-BC-5912, MH-13-AS-2688, एम-२६५०, MH-13-AD-6733, MH-13-BY-0835, MH-13-BL-5849 तसेच जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील MH-12-EN-2314 या मोटारसायकलींचा समावेश आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपी सैफन उर्फ सोहेल बागवान याच्यावर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. तर मोहन नागनाथ साळुंके याच्यावर तब्बल २० गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये मोटारसायकल चोरी, शस्त्र कायदा तसेच महिला विषयक गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस आयुक्त परिमंडळ प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त विभाग-१ अरुण देवकर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, आमसिद्ध निंबाळ, नागेशसिंह चव्हाण, सचिनकुमार लवटे आणि सुहास अर्जुन यांनी कारवाईत सहभाग घेतला.
0 Comments