Advertisement

Responsive Advertisement

सोलापुरात ड्रग (MD) तस्कराला रंगेहाथ अटक; १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या भिवंडी येथील एका ३१ वर्षीय तरुणाला सदर बझार पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. आरोपीकडून तब्बल ५६.९४० ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८६ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अल्तमश मुस्तफा शेख, वय ३१, रा. तुलसी नगर, भिवंडी, जिल्हा ठाणे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, २३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजून ५० मिनिटांनी रेल्वे स्टेशनबाहेरील पुलाजवळील पाण्याच्या टाकीशेजारी असलेल्या पार्किंगमध्ये पोलिस गस्त घालत होते. त्यावेळी संशयास्पदरीत्या थांबलेल्या अल्तमश शेख याची पोलिसांनी अंगझडती घेतली.

या अंगझडतीदरम्यान एका प्लास्टिकच्या झिप लॉक पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटिक स्वरूपातील ५६.९४० ग्रॅम वजनाचे एमडी (MD) आढळून आले. पोलिसांनी १ लाख ७० हजार ८२० रुपये किमतीचे एमडी (MD) ड्रग्ज, १५ हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल आणि ७०० रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ८६ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद निवृत्ती पकाले यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क) आणि २२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे आणि पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत तसेच पोलीस हवालदार मुलांणी, राजेश चव्हाण, प्रमोद पक्षाले, अयाज बागलकोटे, विशाल बोराडे, उमेश चव्हाण, हनुमंत पुजारी, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे काशिनाथ वाडेकर, आनंद निंबाळकर या पथकाने कारवाई पार पडली आहे 

सोलापुरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments