‘यंदा तुझ्यामुळे अस्सल खवा मोदक खायला मिळाले’; देखाव्यातून सुरक्षित अन्नाचा संदेश, तुकाराम मुंढे यांच्या पोस्टरची सर्वाधिक चर्चा
सोलापूर - प्रतिनिधी : गणेश विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक तसेच जनजागृतीपर संदेश देणारे विविध देखावे सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतात. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत विजापूर रोड येथील पंचमुखी कला व सांस्कृतिक मंडळाने साकारलेला भेसळीविरोधी जनजागृतीचा अनोखा देखावा विशेष चर्चेचा विषय ठरला. या देखाव्यात अन्न व औषध प्रशासनाशी संबंधित अधिकारी तुकाराम मुंढे यांचे भव्य पोस्टर, श्री गणरायांची मूर्ती आणि खाद्यपदार्थांतील भेसळीविरोधातील संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
‘यंदा तुझ्यामुळे अस्सल खवा मोदक खायला मिळाले’
पंचमुखी कला व सांस्कृतिक मंडळाच्या देखाव्यात ‘यंदा तुझ्यामुळे अस्सल खवा मोदक खायला मिळाले’ तसेच ‘तुकाराम मुंढे यांच्यामुळे मला चांगला खवा मोदक मिळतोय,’ अशा आशयाचे संदेश देण्यात आले. या माध्यमातून अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या प्रयत्नांबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीतून जाणाऱ्या नागरिकांचे या देखाव्याकडे विशेष लक्ष वेधले गेले.
‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’
देखाव्यावर ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ आणि ‘STOP ADULTERATION’ असे संदेश ठळकपणे प्रदर्शित करण्यात आले होते. ‘भेसळ म्हणजे काय?’, ‘मिलावट’, ‘बनावटपणा’, ‘आरोग्याशी खेळ आणि शिक्षा’ अशा विषयांद्वारे अन्नपदार्थांतील भेसळीचे गांभीर्य नागरिकांसमोर मांडण्यात आले.
विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मोदक, मिठाई, दूध, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता व सुरक्षितता तपासावी आणि भेसळयुक्त पदार्थांपासून सावध राहावे, असा संदेश मंडळाच्या देखाव्यातून देण्यात आला.
‘मी केवळ माझे काम करत आहे’
देखाव्यातील संदेशांमधून ‘मी केवळ माझे काम करत आहे. तुमच्या ताटापर्यंत स्वच्छ, सुरक्षित अन्न पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट’ अशा आशयाची मांडणी करण्यात आली. त्यामुळे हा देखावा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी, अन्नसुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडणारा ठरला.
तुकाराम मुंढे यांच्या पोस्टरचीच सर्वाधिक चर्चा
पंचमुखी कला व सांस्कृतिक मंडळाने उभारलेल्या या देखाव्यात तुकाराम मुंढे यांचे भव्य पोस्टर, गणरायांची मूर्ती आणि खव्याच्या मोदकाचा उल्लेख यामुळे नागरिकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेकांचे लक्ष या देखाव्याकडे वेधले गेले. तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेच्या माध्यमातून भेसळीविरोधी संदेश देण्याच्या मंडळाच्या संकल्पनेची सोलापुरात चर्चा रंगली.
गणेशोत्सवातील उत्साहाला सामाजिक जनजागृतीची जोड देत भेसळमुक्त अन्न, सुरक्षित खाद्यपदार्थ आणि नागरिकांचे आरोग्य हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा पंचमुखी कला व सांस्कृतिक मंडळाचा प्रयत्न विसर्जन मिरवणुकीतील लक्षवेधी उपक्रम ठरला.
0 Comments