Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर हळहळले! युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन; DRM कार्यालयासमोर काळाचा घाला

 
सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर शहरातील परिचित युवा समाजसेवक तथा गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांचे शनिवारी मध्यरात्री दुर्दैवी अपघातात निधन झाले. शनिवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास डीआरएम कार्यालयासमोर दुचाकीचा अपघात होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सोलापूर शहरावर शोककळा पसरली आहे.
विजय जाधव हे गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सोलापूर विकास मंचचे सदस्य होते. सामाजिक आणि नागरी प्रश्नांचा अभ्यास असलेल्या जाधव यांनी सोलापूर जिल्ह्याचे तापमान कमी करण्याच्या उद्देशाने ‘मिशन ३८’ हा उपक्रम सुरू केला होता.
सोलापूर शहरातील विमानसेवा, बेरोजगारांना रोजगार, उड्डाणपूल यांसह विविध नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडत सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
विजय जाधव यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर येताच सोलापूर शहरातील सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांना आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.

युवा समाजसेवक विजय कुंदन जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

Post a Comment

0 Comments