१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम; सुशासन, स्वच्छता, आरोग्य, जलसंधारण आणि लोकसहभागावर भर
सोलापूर - प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, तसेच ग्रामविकासाला लोकसहभागाची जोड देत तो अधिक गतिमान व्हावा, या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अर्थ व बांधकाम समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजित पवार, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘नागरिक केंद्रस्थानी’ ठेवून सेवा देण्याचे आवाहन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत भुजबळ यांनी केले. त्यांनी अभियानाची उद्दिष्टे, स्वरूप आणि जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. चेतनसिंह केदार-सावंत यांनी नागरिकांशी प्रभावी संवाद साधून शासनाच्या योजना व सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
अध्यक्ष दीपक वैद्य यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना अभियान प्रभावी, नियोजनबद्ध आणि नागरिकाभिमुख पद्धतीने राबविण्याचे आवाहन केले. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
“एक दिवस स्वच्छतेसाठी द्या” — उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी ‘सेवा संकल्प अभियानासोबतच’ २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता महाश्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले. मार्डी येथे सुरू झालेल्या श्रमदानाच्या उपक्रमाचा संदर्भ देत अकोलेकाटी व बिबिदारफळ येथेही श्रमदानातून स्वच्छतेच्या कामांना चालना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. “गावासाठी प्रत्येकाने एक दिवस दिल्यास स्वच्छतेची मोठी चळवळ उभी राहू शकते,” असे आवाहन त्यांनी केले.
महिनाभर विकासाचा कृती आराखडा
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी अभियानासाठी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम करून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अभियानाच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, विविध शासकीय सेवा तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासोबतच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
सेवा संकल्प ग्रामसभेतून अभियानाला सुरुवात
ग्रामपंचायतीमध्ये ‘सेवा संकल्प ग्रामसभा’ घेऊन अभियानाची उद्दिष्टे नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहेत. उपलब्ध शासकीय सेवा व योजनांची माहिती, गावातील प्राधान्याची विकासकामे, स्थानिक गरजा आणि आगामी उपक्रमांचे नियोजन यावर ग्रामसभेत चर्चा होणार आहे. महिला बचत गट, युवक, ग्रामस्तरीय समित्या, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्यावर भर देण्यात आला आहे.
चार आठवडे, चार विकासाचे टप्पे
पहिला सप्ताह — सुशासन व नागरिक सेवा :
दाखले, प्रमाणपत्रे, जन्म-मृत्यू नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम.
दुसरा सप्ताह — सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण :
शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी व सार्वजनिक संस्थांमध्ये पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छता, संरक्षण भिंत, परसबाग आणि आवश्यक दुरुस्तीची कामे.
तिसरा सप्ताह — जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव :
जलसंधारण, जलस्रोत स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन.
चौथा सप्ताह — आरोग्य, पोषण व महिला सक्षमीकरण :
आरोग्य तपासणी, पोषण व ॲनिमियाबाबत जनजागृती, महिलांचे आरोग्य, बचत गटांचे सक्षमीकरण, महिला शेतकरी उत्पादक संस्था आणि आर्थिक सक्षमीकरणाशी संबंधित उपक्रम.
‘गावासाठी एक दिवस’ ठरणार लोकसहभागाची नवी दिशा
अभियानातील विशेष उपक्रम म्हणून प्रत्येक आठवड्यात किमान एक दिवस ‘गावासाठी एक दिवस’ या संकल्पनेतून श्रमदान केले जाणार आहे. ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे, ग्रामस्तरीय समित्या, स्थानिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून स्वच्छता, जलस्रोत स्वच्छता, शाळा-अंगणवाडी परिसर सुधारणा, वृक्षसंवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
सेवा, विकास आणि लोकसहभाग यांचा संगम घडवून गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न ‘सेवा संकल्प अभियानातून’ होणार आहे. त्यामुळे हे अभियान केवळ शासकीय उपक्रम न राहता नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ग्रामविकासाची चळवळ बनण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव जाधव यांनी केले, तर आभार सूर्यकांत भुजबळ यांनी मानले.
0 Comments